अटींच्या उल्लंघनांचे निराकरण करणे
Shopify मध्ये, आमचा असा विश्वास आहे की कल्पना आणि उत्पादनांची मुक्त आणि खुली देवाणघेवाण हे वाणिज्याचे मुख्य तत्त्व आहे, परंतु काही अॅक्टिव्हिटीज वाणिज्य प्रत्येकासाठी उत्तम बनवण्याच्या Shopify च्या ध्येयाशी विसंगत आहेत. Shopify च्या सेवेच्या अटी आणि सेवेच्या पूरक अटींमध्ये दिलेल्या मार्गदर्शनासह प्रत्येक मर्चंटसोबतच्या आमच्या विविध करारांद्वारे आम्ही आमच्या अटींची अंमलबजावणी करतो. आम्ही आमच्या स्वीकार्य वापर धोरणामध्ये Shopify चा धोरणांबद्दलचा दृष्टिकोन स्पष्ट करतो. Shopify आमची मार्गदर्शक तत्त्वे कशी लागू करते आणि आमच्या अटींचे उल्लंघन केल्याबद्दल संभाव्य परिणाम जाणून घेण्यासाठी या लेखाचे पुनरावलोकन करा.
जर एखाद्या अटींच्या समस्येसाठी तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये कृती करणे आवश्यक असेल, तर तुम्ही सेलर हेल्थ मध्ये त्या कृतीचे पुनरावलोकन करू शकाल.
या पृष्ठावर
Shopify च्या अटी समजून घेणे
आम्हाला समजते की कायदे आणि नियम गुंतागुंतीचे असू शकतात आणि काहीवेळा गैरसमजांमुळे समस्या उद्भवतात. त्यामुळे, प्रामाणिक चुका आणि जाणीवपूर्वक केलेली उल्लंघने यांमध्ये फरक करण्यासाठी Shopify च्या अटी काळजीपूर्वक निश्चित केल्या आहेत. समस्येच्या स्वरूपावर अवलंबून, जर तुम्ही Shopify च्या अटींचे उल्लंघन केले, तर आम्ही खालील कृती करू शकतो:
- ईमेलद्वारे अधिक माहिती मागवणे आणि तुम्हाला प्रतिसाद देण्यास सांगणे.
- तुम्ही Shopify सपोर्ट कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन केल्यास, तुम्हाला Shopify सपोर्टशी संपर्क साधण्यापासून ब्लॉक करणे.
- विशिष्ट प्रदेशांमध्ये काही उत्पादनांची विक्री किंवा शिपमेंट थांबवण्यासाठी तुमच्या स्टोअरच्या Shopify ॲडमिनमधील शिपिंग सेटिंग्ज बदलणे.
- ईमेलद्वारे समस्येबद्दल संवाद साधणे आणि तुम्हाला विशिष्ट आशय काढून टाकण्यास सांगणे.
- तुमच्या ऑनलाइन स्टोअरमधून उल्लंघन करणारा आशय काढून टाकणे.
- तुम्हाला पेमेंट्स प्राप्त करण्यापासून, शिपिंग लेबल्स खरेदी करण्यापासून, शुल्कावर प्रक्रिया करण्यापासून, परतावा सुरू करण्यापासून किंवा निधी ट्रान्सफर करण्यापासून रोखणे.
- तुम्हाला तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये प्रवेश करण्यापासून तात्पुरते रोखणे.
- तुमचे ऑनलाइन स्टोअर तात्पुरते लॉक करणे.
- तुमचे खाते समाप्त करणे.
अटींच्या उल्लंघनांचे निवारण करण्यासाठी Shopify सोबत काम करणे
Shopify मर्चंट म्हणून, प्लॅटफॉर्म वापरताना उद्भवू शकणाऱ्या अटींच्या उल्लंघनांना कसे हाताळावे आणि सोडवावे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
मर्चंटचे पेमेंट्स निष्क्रिय करणे
मर्चंट्सचे पेमेंट्स फसवणूक-विरोधी संरक्षण उपायांसह विविध कारणांसाठी तात्पुरते निष्क्रिय केले जाऊ शकतात. तुम्हाला पेमेंट्स निष्क्रिय करण्याबद्दल सूचित करणारा ईमेल प्राप्त झाल्यास, तुम्हाला ईमेलमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. या सूचना तुम्ही उचलू शकणार्या पुढील पावलांची रूपरेषा देतील किंवा तुमच्या विशिष्ट परिस्थितीविषयी अधिक माहिती देतील.
उत्पादन काढून टाकणे
नोंदवलेले कॉपीराइट किंवा बौद्धिक संपदेचे उल्लंघन यांसारख्या विशिष्ट परिस्थितींमध्ये, किंवा जर एखाद्या उत्पादनाची विक्री बेकायदेशीर असेल, Shopify च्या सेवेच्या अटींचे उल्लंघन करत असेल किंवा तुम्ही वापरत असलेल्या दुसऱ्या Shopify उत्पादनाच्या अटींचे जसे की Shopify Payments च्या सेवेच्या अटी किंवा Shop ॲप आशय धोरणांचे उल्लंघन करत असेल तर Shopify तुमच्या ऑनलाइन स्टोअरमधून उत्पादने काढून टाकू शकते.
उत्पादन काढून टाकले असल्याचे सांगणारा ईमेल किंवा तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये सूचना प्राप्त झाल्यास, तुम्हाला प्राप्त झालेल्या ईमेल किंवा सूचनेमधील निर्देशांचे पुनरावलोकन करणे महत्त्वाचे आहे. या सूचना तुम्हाला पुढील कोणती पावले उचलायची याबद्दल मार्गदर्शन करतील किंवा तुमच्या विशिष्ट परिस्थितीविषयी अतिरिक्त माहिती देतील.
मर्यादित Shopify ॲडमिन ॲक्सेस
दुर्मिळ प्रकरणांमध्ये, जर तुमच्याकडून महत्त्वाची माहिती आवश्यक असेल आणि तुम्ही आमच्या ईमेल्सना प्रतिसाद दिला नसेल, तर Shopify तुमच्या ऑनलाइन स्टोअरचा ॲडमिन ॲक्सेस लॉक करू शकते. उदाहरणार्थ, तुम्ही नियंत्रित उत्पादनाची विक्री करण्यासाठी अधिकृत आहात याचा पुरावा देण्याचा यामध्ये समावेश असू शकतो.
तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये प्रवेश करू शकत नसल्यास, Shopify कडून आलेल्या कोणत्याही संवादासाठी तुमचा ईमेल तपासा. ईमेलमध्ये पुढे कसे जावे आणि विनंती केलेली माहिती कशी द्यावी याबद्दल सूचना असतील.
Shopify Payments खाते होल्डवर
Shopify विविध कारणांसाठी तुमची Shopify Payments वापरण्याची क्षमता तात्पुरती किंवा कायमची थांबवू शकते किंवा मर्यादित करू शकते. जर तुमचे Shopify Payments खाते होल्डवर असेल, तर होल्ड सोडवण्याचा सर्वात जलद मार्ग म्हणजे Shopify ने तुम्हाला पाठवलेल्या ईमेलला प्रतिसाद देणे. Shopify Payments खाते होल्डवर असण्याबद्दल अधिक जाणून घ्या.
Shopify स्टोअरची समाप्ती
तुमचे Shopify स्टोअर समाप्त केले असल्यास आणि ऑफलाइन नेले असल्यास, आणि ही कृती एक चूक होती असे तुम्हाला वाटत असल्यास, Shopify समाप्तीविरुद्ध अपील करण्याची प्रक्रिया प्रदान करते. तुम्हाला ईमेलद्वारे प्राप्त झालेली सूचना अपील सबमिट करण्यासाठी फॉलो करावयाच्या पायऱ्यांची रूपरेषा देईल. Shopify तुमच्या अपीलचे पुनरावलोकन करेल आणि तुमचे Shopify स्टोअर पुन्हा उघडले जाऊ शकते का ते तुम्हाला कळवेल. Shopify स्टोअरची समाप्ती कशी हाताळावी याविषयी अधिक जाणून घ्या.
स्वयंचलित प्रक्रिया आणि खाते निर्बंध
Shopify च्या धोरणांचे उल्लंघन ओळखण्यासाठी आणि त्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी Shopify स्वयंचलित आणि मानवी पुनरावलोकन प्रक्रियांचे संयोजन वापरते. तुमच्या खात्यावर निर्बंध आणले असल्यास, तुम्हाला त्या निर्णयाविरुद्ध अपील करण्याचा पर्याय आहे. प्रत्येक अपीलचे पुनरावलोकन Shopify टीम सदस्याद्वारे केले जाते, जे मानवाद्वारे तुमच्या प्रकरणाचे पुनरावलोकन केले जात असल्याची खात्री करते.
खात्यावरील निर्बंधांविरुद्ध अपील करणे
अटींच्या उल्लंघनामुळे तुमचे खाते मर्यादित केले असल्यास, Shopify तुम्हाला ईमेलद्वारे किंवा तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये सूचित करेल. जर तुम्हाला काही चूक झाली आहे असे वाटत असेल, तर तुम्ही सूचनेमध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन करून अपील सबमिट करू शकता. तुम्ही दिलेल्या माहितीचा आम्ही विचार करू आणि अतिरिक्त तपशील किंवा कागदपत्रांसाठी संपर्क साधू. त्यानंतर तुमचे अपील मंजूर झाले आहे की नाकारले गेले आहे हे Shopify तुम्हाला ईमेलद्वारे सूचित करेल.