आकर्षक उत्पादन वर्णने लिहिणे
आकर्षक उत्पादन वर्णने लिहिण्यासाठी, खालीलपैकी कोणतीही किंवा सर्व युक्ती वापरण्याचा विचार करा.
तुमच्या आदर्श ग्राहकावर लक्ष केंद्रित करणे
तुम्ही तुमची उत्पादन वर्णने लिहीत असताना तुमच्या आदर्श ग्राहकाची किंवा तुमच्या टार्गेट ऑडियन्सची कल्पना करा आणि त्यांना थेट संबोधित करा. कोणालाही उद्देशून सामान्यपणे लिहिण्याऐवजी, तुम्ही तुमच्या आदर्श ग्राहकाशी संवाद साधत असल्यासारखे प्रश्न विचारा आणि त्यांची उत्तरे द्या.
स्वतःला खालीलपैकी काही प्रश्न विचारण्याचा विचार करा:
- असल्यास, तुमच्या ग्राहकांना कोणत्या प्रकारचा विनोद आवडतो?
- तुमचे ग्राहक कोणते शब्द वापरतात? त्यांना कोणते शब्द आवडत नाहीत?
- तुमचे ग्राहक कोणते प्रश्न विचारतात, ज्यांची उत्तरे तुम्ही द्यायला हवीत?
तुम्ही ती भाषा तुमच्या स्टोअरमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू शकता जेणेकरून तुम्ही ऑनलाइन असाच संवाद साधू शकाल जो अधिक वास्तववादी आणि अस्सल वाटेल.
फायद्यांसह ग्राहकांना आकर्षित करणे
तुमच्या उत्पादनाचे फायदे हायलाइट करा जेणेकरून ते त्यांना कशी मदत करू शकेल हे तुमच्या ग्राहकांना समजेल. तुम्ही तुमच्या उत्पादनाची वैशिष्ट्ये आणि फायदे एका बुलेटेड सूचीमध्ये आयोजित करू शकता आणि त्यात कोणतेही तांत्रिक तपशील समाविष्ट करू शकता.
खालील प्रश्नांचा विचार करा:
- तुमचे उत्पादन तुमच्या ग्राहकांना अधिक आनंदी, निरोगी किंवा अधिक उत्पादक कसे बनवते?
- तुमचे उत्पादन कोणत्या समस्या, अडचणी आणि त्रास सोडवण्यात मदत करते?
- तुमच्या उत्पादनाची मूलभूत वैशिष्ट्ये कोणती आहेत? तुम्ही कपडे विकत असल्यास, कोणतेही डायमेंशन, मटेरिअल, कार्ये, काळजी घेण्यासंबंधी सूचना आणि फिटिंगबद्दलचे तपशील लिहून काढा.
- उत्पादनाचा सर्वोत्तम वापर कधी होतो? शेकोटीजवळ बसून गरम कोकोच्या कपाचा आस्वाद घेताना थंड हिवाळ्याच्या रात्रींसाठी तुमचे उबदार ब्लँकेट योग्य आहे का? की सूर्य मावळत असताना शरद ऋतूतील आल्हाददायक संध्याकाळसाठी ते अधिक योग्य आहे? ग्राहकाने तुमचे उत्पादन कधी वापरावे यासाठीचे आदर्श प्रसंग हायलाइट करा.
- तुमचे उत्पादन कशामुळे विशेष बनते? तुमच्या उत्पादनाच्या अनोख्या फायद्यांचा विचार करा आणि ते तुमच्या स्पर्धकांच्या उत्पादनापेक्षा का चांगले आहे याचा विचार करा.
सामान्य विधाने टाळणे
तुमच्या उत्पादन वर्णनांमध्ये विशिष्ट असा. उत्पादनाचे तपशील विश्वासार्हता वाढवतात आणि तुमचे उत्पादन विकण्यात मदत करतात. “उत्कृष्ट उत्पादन गुणवत्ता” असे काहीतरी संदिग्ध लिहिल्याने तुमच्या ग्राहकाला कोणतीही ठोस माहिती मिळत नाही आणि जर तुम्ही पुरावा दिला नाही, तर त्यांच्या मनात शंका निर्माण होऊ शकते.
जर तुम्ही पुनर्विक्रेते असाल, तर उत्पादकाचे अचूक वर्णन कॉपी करू नका. तुमचे स्वतःचे वर्णन लिहिल्याने तुमचे उत्पादन पेज सर्च इंजिनसाठी युनिक (unique) राहण्यास मदत होते.
उत्पादनाच्या फायद्यांसाठी पुरावा देणे
तुम्ही तुमच्या उत्पादनांबद्दल करत असलेले कोणतेही दावे वस्तुस्थितीवर आधारित असल्याची खात्री करा. जर तुमचे उत्पादन त्याच्या श्रेणीतील सर्वोत्तम असेल, तर हे सत्य का आहे याचा पुरावा द्या. अन्यथा, तुमच्या उत्पादनाच्या कॉपीतील दाव्यांची तीव्रता कमी करा, किंवा एखादा ग्राहक ज्याने म्हटले आहे की तुमचे उत्पादन त्यांनी वापरलेली आतापर्यंतची सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे, त्याचे विधान उद्धृत करा.
तुमच्या ग्राहकांच्या कल्पनाशक्तीला साद घालणे
जर तुमचे स्टोअर ऑनलाइन असेल, तर ग्राहक उत्पादन त्यांच्या हातात घेऊ शकत नाहीत. तुमचे उत्पादन जवळ असणे कसे वाटेल याची कल्पना करण्यास तुमच्या ग्राहकाला मदत करा. एखादे वाक्य “कल्पना करा” या शब्दाने सुरू करून पाहा आणि तुमचे उत्पादन घेताना आणि वापरताना तुमच्या वाचकाला कसे वाटेल हे स्पष्ट करून तुमचे वाक्य किंवा परिच्छेद पूर्ण करा.
ग्राहकांशी कनेक्ट होण्यासाठी मिनी-स्टोरीज वापरणे
तुमच्या उत्पादन वर्णनांमध्ये छोट्या कथा समाविष्ट करा. कथा ग्राहकांना तुमच्या ब्रँडशी जोडण्यात आणि उत्पादनाशी कनेक्ट होण्यात मदत करतात.
जेव्हा तुमच्या उत्पादनांबद्दल कथा सांगण्याची वेळ येते, तेव्हा स्वतःला खालील प्रश्न विचारा:
- उत्पादन कोण बनवत आहे?
- उत्पादन तयार करण्यासाठी कशातून प्रेरणा मिळाली?
- उत्पादन विकसित करण्यासाठी तुम्हाला कोणत्या अडथळ्यांवर मात करावी लागली?
- उत्पादनाची चाचणी कशी केली गेली?
संवेदी शब्द समाविष्ट करणे
सुस्पष्ट उत्पादन वर्णनांसह तुमच्या वाचकांना गुंतवून ठेवा. उत्पादनासोबतच्या संवेदी संवादाचे वर्णन करणारी विशेषणे, तुमच्या ग्राहकांना वाचत असताना उत्पादनाचा अनुभव घेण्यास मदत करू शकतात.
उदाहरणार्थ, जर तुम्ही खाद्यपदार्थ विकत असाल, तर “मखमली”, “गुळगुळीत”, “कुरकुरीत” आणि “तेजस्वी” यांसारख्या शब्दांचा विचार करा.
सोशल प्रूफसह विश्वास निर्माण करणे
ग्राहकांची प्रशस्तिपत्रे किंवा सोशल मीडिया फीड समाविष्ट करा जेणेकरून संभाव्य ग्राहक मागील ग्राहकांच्या तुमच्या उत्पादनांसोबतच्या अनुभवांबद्दल वाचू शकतील. जर तुम्ही ग्राहकांची प्रशस्तिपत्रे समाविष्ट करत असाल, तर विश्वासार्हता वाढवण्यासाठी उत्पादनाचा वापर करत असलेल्या ग्राहकाची इमेज समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही तुमची उत्पादने वापरत असलेल्या खऱ्या लोकांची उदाहरणे शेअर करता, तेव्हा संभाव्य ग्राहक त्यांच्या उत्पादनाच्या निवडींबद्दल अधिक खात्री बाळगू शकतात.
तुमच्या वेबसाइटवर उत्पादन पुनरावलोकने मिळवण्यासाठी तुम्ही ग्राहक पुनरावलोकने अॅप वापरू शकता आणि Google किंवा Facebook सारख्या तृतीय-पक्ष साइट्सवरील इतर पुनरावलोकने एकत्रित करू शकता.
तुमचे वर्णन स्कॅन करण्यायोग्य बनवणे
तुमचे उत्पादन वर्णन स्पष्ट आणि स्कॅन करण्यायोग्य असल्याची खात्री करा जेणेकरून ते वाचण्यास सोपे असेल आणि संभाव्य ग्राहकांना अधिक आकर्षक वाटेल. उत्पादन तपशील पेजवरील वर्णन फील्ड रिच टेक्स्ट एडिटर वापरते, ज्यामुळे तुम्ही तुमचा मजकूर फॉरमॅट करू शकता.
तुम्ही तुमची उत्पादन वर्णने लिहीत असताना लक्ष केंद्रित करण्यासाठी खालील क्षेत्रांचा विचार करा:
- तुमच्या वेब व्हिजिटरला हेडलाइन्ससह आकर्षित करा.
- सूचींसाठी बुलेट पॉइंट्स वापरा.
- भरपूर मोकळी जागा समाविष्ट करा.
- वाचनीयता वाढवण्यासाठी तुमचा फॉन्ट आकार वाढवा.
- उच्च दर्जाच्या उत्पादन प्रतिमा वापरा.
यश मोजण्यासाठी उद्दिष्टे सेट करणे
तुमच्या उत्पादन वर्णनांमुळे अधिक विक्री होत आहे की नाही हे समजून घेण्यासाठी तुमच्या उत्पादन पेजेसवर ट्रॅक करण्यासाठी मेट्रिक्सचा संच ठरवा. या मेट्रिक्सची व्याख्या केल्याने तुम्हाला कोणती उत्पादन वर्णने सर्वोत्तम काम करत आहेत हे समजण्यास मदत होते आणि नंतर कमी कामगिरी करत असलेल्या वर्णनांमध्ये सुधारणा करता येते.
देखरेख करण्यासाठी काही सामान्य मेट्रिक्स खालीलप्रमाणे आहेत:
- कन्व्हर्जन दर
- कार्ट अर्धवट सोडणे
- रिटर्न दर
- सपोर्ट चौकशी
- ऑरगॅनिक शोध रँकिंग्ज
तुम्ही Shopify App Store मधील A/B टेस्टिंग अॅप वापरून विविध A/B चाचण्या रन करू शकता, ज्याचा परिणाम म्हणून तुमच्या ई-कॉमर्स वेबसाइटसाठी अधिक कन्व्हर्जन्स आणि विक्री होऊ शकते.