ड्रॉपशिपिंगची वैशिष्ट्ये
ड्रॉपशिपिंगकडे कधीकधी व्यवसायातील नवशिक्यांचा मार्ग म्हणून पाहिले जाते कारण ते सेट करणे सोपे असते आणि सुरुवात करण्यासाठी जास्त खर्च येत नाही. तथापि, बऱ्याच मोठ्या आणि यशस्वी व्यवसायांसाठी उत्पादने मिळवण्यासाठी ड्रॉपशिपिंग ही एक सामान्य पद्धत आहे.
ड्रॉपशिपिंगचे अनेक फायदे आहेत, परंतु संभाव्य तोटे आणि ते कसे टाळावे हे जाणून घेतल्याने तुमच्या व्यवसायाला यशस्वी होण्यास मदत होऊ शकते. तुम्हाला ड्रॉपशिपिंगची वैशिष्ट्ये माहीत असल्याची खात्री करा जेणेकरून तुम्ही व्यवसायाचे योग्य निर्णय घेऊ शकाल.
ड्रॉपशिपिंगची वैशिष्ट्ये
| वैशिष्ट्य | फायदे | तोटे |
|---|---|---|
| सुरू करण्यास सोपे |
सुरुवात करण्यासाठी कमी वेळ लागतो तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी अनेक संसाधने उपलब्ध आहेत |
अधिक स्पर्धा |
| सुरुवातीचा कमी खर्च |
कोणतेही वेअरहाऊस, इन्व्हेंटरी किंवा संशोधनाचा खर्च नाही तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग आणि जाहिरात करण्यासाठी अधिक निधी उपलब्ध असतो |
अधिक स्पर्धा |
| उत्पादनांची मोठी निवड |
तुम्हाला काय विकायचे आहे ते शोधणे सोपे असते तुम्ही ऑफर करत असलेली उत्पादने बदलणे सोपे असते |
तुमच्या व्यवसायासाठी एखादे लक्ष केंद्रित करण्याचे क्षेत्र निवडणे कठीण असू शकते |
| इन्व्हेंटरी उपलब्ध ठेवण्याची गरज नाही |
स्टोरेज किंवा वेअरहाऊसचा कोणताही खर्च नाही |
कमी गुणवत्ता नियंत्रण ब्रँडिंगवर कमी नियंत्रण |
| स्वतः उत्पादने शिप करण्याची आवश्यकता नाही |
पॅकेजिंग किंवा लेबल्स प्रिंट करण्यात वेळ खर्च होत नाही |
एकाधिक पुरवठादारांच्या उत्पादनांचा समावेश असलेल्या ऑर्डर्स वेगवेगळ्या वेळी येतात |
सुरू करण्यास सोपे
ड्रॉपशिपिंग आकर्षक असण्याचे एक कारण म्हणजे ते सेट करणे सोपे असू शकते. सुरुवातीला, तुम्हाला फक्त उत्पादने निवडायची असतात, ती कुठे विकायची आणि त्यांचे मार्केटिंग कुठे करायचे ते शोधायचे असते आणि त्यानंतर ग्राहकाकडून ऑर्डर मिळवायची असते. तुम्ही विक्री केल्यानंतर, तुमचा पुरवठादार उर्वरित गोष्टी करतो.
ड्रॉपशिपिंगचा व्यवसाय सुरू करणे सोपे असल्यामुळे, स्पर्धा निर्माण होणे सोपे असते. अधिक स्पर्धेमुळे सहसा नफा मार्जिन कमी होतो कारण व्यवसाय अनेकदा सर्वात कमी किंमत ठेवण्यासाठी स्पर्धा करतात.
अधिक माहितीसाठी, तुमच्या फायद्यासाठी निधी गुंतवा पहा.
सुरुवातीचा कमी खर्च
ड्रॉपशिपिंग व्यवसायाचा सुरुवातीचा खर्च सहसा कमी असतो. इन्व्हेंटरी, वेअरहाउसिंग, संशोधन आणि विकास किंवा रिटेल जागेशी संबंधित कोणताही खर्च नसतो. हे तुम्हाला तुमचे प्रयत्न मार्केटिंगवर आणि तुमच्या ग्राहकांसाठी एक चांगला खरेदीचा अनुभव तयार करण्यावर केंद्रित करू देते.
सुरुवातीचा खर्च कमी असल्यामुळे अधिक स्पर्धाही निर्माण होते. जेव्हा तुमच्याकडे अधिक स्पर्धा असते, तेव्हा तुम्हाला कमी ऑर्डर्स मिळतात आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अनेकदा तुमच्या किंमती कमी कराव्या लागतात.
अधिक माहितीसाठी, तुमच्या फायद्यासाठी निधी गुंतवा पहा.
उत्पादनांची मोठी निवड
ड्रॉपशिपिंग सेवांसह, तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये जोडण्यासाठी हजारो उत्पादनांचा ॲक्सेस मिळतो. तुम्ही विक्रीसाठी निवडलेल्या उत्पादनांना तुमची उत्पादन लाइन म्हटले जाते. जेव्हा तुम्हाला उत्पादनांच्या मोठ्या निवडीचा ॲक्सेस असतो, तेव्हा तुमची उत्पादन लाइन कधीही बदलणे सोपे असते, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधील ट्रेंड्स आणि ग्राहकांच्या अभिप्रायावर त्वरित प्रतिक्रिया देता येते.
तथापि, तुमच्या उत्पादन लाइनमध्ये अनेक भिन्न उत्पादने जोडल्याने तुमच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. बऱ्याच प्रकरणांमध्ये, तुम्ही विक्री करण्यासाठी निवडलेल्या उत्पादनांच्या प्रकारांवर एखादे लक्ष केंद्रित करणे किंवा एखादा विशिष्ट भाग निवडणे अधिक चांगले असते.
अधिक माहितीसाठी, उत्पादने शहाणपणाने निवडा पहा.
इन्व्हेंटरी उपलब्ध ठेवण्याची गरज नाही
जेव्हा तुम्हाला स्वतः इन्व्हेंटरी ऑर्डर आणि स्टॉक करण्याची आवश्यकता नसते, तेव्हा तुम्ही वेअरहाऊसचा खर्च वाचवता आणि लगेचच विक्री सुरू करू शकता. तुम्हाला वेअरहाऊसमध्ये खाती सेट करण्याची किंवा तुमची उत्पादने कशी पॅकेज करायची हे ठरवण्याची आवश्यकता नाही. पुरवठादार तुमच्यासाठी सर्व स्टोरेज आणि पॅकेजिंगचे काम करतात.
याची एक उणीव अशी आहे की, तुमच्या उत्पादनांची गुणवत्ता, पॅकेजिंगचे ब्रँडिंग किंवा ऑर्डर प्रक्रियेच्या गतीवर तुमचे कोणतेही नियंत्रण नसते. या गोष्टी सकारात्मक पुनरावलोकने आणि परत येणारे ग्राहक मिळवण्यासाठी मदत करतात, जे तुमच्या व्यवसायासाठी महत्त्वाचे असतात.
अधिक माहितीसाठी, पुरवठादार हुशारीने निवडा पहा.
उत्पादने स्वतः शिप करण्याची गरज नाही
व्यवसाय चालवताना शिपिंग हा एक गुंतागुंतीचा भाग असू शकतो. उत्पादने स्वतः शिप करण्याऐवजी पुरवठादाराचा वापर करून, तुम्ही बराच वेळ वाचवू शकता. तुमच्या पुरवठादारांनी शिपिंग वाहकांसोबत वाटाघाटी करून मिळवलेल्या शिपिंग सवलतींचाही तुम्ही लाभ घेऊ शकता.
मात्र, मोठ्या ऑर्डर्स हाताळण्याच्या प्रयत्नात तुम्ही वाचवलेला वेळ आणि पैसा वाया जाऊ शकतो. उदाहरणार्थ, तुम्हाला वेगवेगळ्या पुरवठादारांच्या उत्पादनांचा समावेश असलेली एखादी ऑर्डर मिळाल्यास, तुम्हाला प्रत्येक पुरवठादाराला प्रत्येक उत्पादनासाठी शिपिंग खर्च द्यावा लागतो. मात्र, जर तुमच्याकडे उत्पादने स्वतः उपलब्ध असतील, तर तुम्ही ती सर्व एकाच बॉक्समध्ये पॅकेज करू शकता आणि फक्त एकाच शिपिंग खर्चाचे पेमेंट करू शकता.
अधिक माहितीसाठी, तुमच्या स्वतःच्या ठिकाणी उत्पादने ऑर्डर करा पहा.
फायद्यांचा चांगला वापर करा
जो कोणी ड्रॉपशिपिंग व्यवसाय सुरू करतो त्याला हे फायदे मिळतातच, परंतु तुम्ही त्यांचा पुरेपूर फायदा घेत आहात याची खात्री करण्याचे काही मार्ग येथे आहेत.
तुमचा व्यवसाय लवकर लॉन्च करा
ग्राहकांना दाखवण्यापूर्वी आपला व्यवसाय परिपूर्ण होईपर्यंत वाट पाहण्याची इच्छा असणे साहजिक आहे. मात्र, ड्रॉपशिपिंगचा एक मोठा फायदा म्हणजे तुम्ही किती वेगाने व्यवसाय सेट करू शकता.
तुम्ही जितक्या लवकर ग्राहकांना तुमचा व्यवसाय पाहू द्याल, तितक्या लवकर तुम्हाला अभिप्राय मिळेल, तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकू शकाल आणि तुमचा व्यवसाय अधिक चांगला बनवू शकाल. उदाहरणार्थ, उत्पादन संग्रह आणि तुमचा मुख्य मेनू सेट करण्यासाठी तुम्ही बराच वेळ खर्च करू शकता आणि शेवटी तुम्हाला असे आढळून येऊ शकते की, तुमचे ग्राहक तुमची उत्पादने पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने ब्राउझ करतात आणि मग तुम्हाला सर्वकाही पुन्हा करावे लागते.
तुमच्या ग्राहकांच्या अभिप्रायाशिवाय तुमच्या व्यवसायासाठी सर्वोत्तम काय आहे हे जाणून घेणे कठीण आहे. तुम्ही तुमचा व्यवसाय लवकर लॉन्च केल्यास, तुमच्या ग्राहकांचा अभिप्राय आणि तुम्ही शिकलेले धडे लक्षात ठेवून तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता.
तुमच्या फायद्यासाठी निधी वापरा
तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी खर्च येत असल्याचा अर्थ असा आहे की तुम्ही वाचवलेल्या निधीपैकी काही भाग तुमच्या स्पर्धकांपेक्षा चांगला व्यवसाय तयार करण्यासाठी लावू शकता. स्वतःला विचारण्यासाठी एक चांगला प्रश्न आहे “माझ्या स्पर्धकांपेक्षा मला काय वेगळे बनवते?” जर तुम्ही यावर आधी विचार केला नसेल तर याचे उत्तर देणे कठीण असू शकते, पण असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या स्पर्धकांवर फायदा मिळवू शकता:
अतिरिक्त सामग्री - तुम्ही तुमच्या उत्पादनांबद्दल ब्लॉग पोस्ट तयार करू शकता किंवा त्या लिहिण्यासाठी एखाद्या सामग्री क्रिएटरला पैसे देऊ शकता, ज्यामुळे तुमच्या ग्राहकांना अतिरिक्त मूल्य मिळते. यामध्ये तुमची उत्पादने कशी वापरावीत याविषयीच्या टिप्स, तुमच्या उत्पादनांची पुनरावलोकने किंवा तुमची उत्पादने ज्या विशिष्ट श्रेणीमध्ये येतात त्याविषयीची सामान्य माहिती असू शकते.
उदाहरणार्थ, जर तुम्ही कॉफी मशीन विकत असाल, तर प्रत्येक कॉफी मशीनची पुनरावलोकने आणि कोणते मशीन कोणत्या प्रकारच्या व्यक्तीसाठी योग्य ठरेल, यावरील ब्लॉग सिरीज चांगली असू शकते. विश्वसनीयता, मूल्य, आकार आणि एका तासात ती किती कप कॉफी बनवू शकते यासारखे तुमचे स्वतःचे निकष तयार केल्याने, तुमच्या ग्राहकांना तुमच्या व्यवसायातून खरेदी करण्याचा अधिक आत्मविश्वास मिळू शकतो. एखाद्या विद्यापीठातील विद्यार्थ्याला जलदगतीने भरपूर कॉफी बनवू शकणारे स्वस्त मशीन हवे असू शकते, परंतु विद्यापीठातील प्राध्यापकाला त्यांच्या छोट्या ऑफिसमध्ये दिवसाची सुरुवात करण्यासाठी उत्तम कॉफीचा एक कप हवा असू शकतो.
पुरवठादारांपर्यंत विशेष ॲक्सेस - स्पर्धेचे प्रमाण कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे अशा पुरवठादारांपर्यंत पोहोचणे ज्यांच्याकडून खूप कमी व्यवसाय खरेदी करू शकतात किंवा अशी ट्रेडमार्क उत्पादने शोधणे जी केवळ मोजकेच व्यवसाय विकू शकतात. हे तुम्हाला परत येणारे ग्राहक मिळवण्यासाठी मदत करते कारण तुम्ही अशा मोजक्या ठिकाणांपैकी एक आहात जिथून ते ती उत्पादने खरेदी करू शकतात.
उदाहरणार्थ, जर तुम्हाला अशा टीव्ही शोमधील सामग्री असलेली उत्पादने विकायची असतील ज्याचे प्रेक्षक कमी असले तरी ते एकनिष्ठ आहेत, तर तुम्ही त्या टीव्ही शोमधील पात्रांची उत्पादने विकण्यासाठी त्यांचा परवाना मिळवू शकता. हा परवाना मिळवणे कठीण असू शकते, पण याचा अर्थ असा की तुमचे जास्त स्पर्धक नसतील आणि बाजारपेठेवर तुमचे अधिक नियंत्रण असेल.
खरेदीचा उत्तम अनुभव - तुमच्या स्पर्धकांपेक्षा वेगळे ठरण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे तुमच्या ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव प्रदान करणे होय. जर एखाद्या ग्राहकाला तुमच्या स्टोअरमधून हवे असलेले उत्पादन मिळाले आणि त्यांनी तुमच्याकडून खरेदी करण्याच्या अनुभवाचा आनंद घेतला, तर ते तुमच्याकडून पुन्हा खरेदी करतील आणि त्यांचा अनुभव इतरांसोबत शेअर करतील अशी शक्यता अधिक असते.
स्वतःला विचारण्यासाठी काही चांगले प्रश्न खालीलप्रमाणे आहेत:
- ग्राहकांना ते शोधत असलेली उत्पादने शोधणे सोपे आहे का?
- व्यवसायाशी संपर्क साधणे सोपे आहे का?
- उत्पादन तपशील, उत्पादन पुनरावलोकने, डिलिव्हरीची वेळ, शिपिंग खर्च आणि स्टोअर धोरणे शोधणे सोपे आहे का?
- विविध पेमेंट पर्याय उपलब्ध आहेत का?
- ट्रॅकिंग नंबर प्रदान केला आहे का?
- उत्पादन दिलेल्या डिलिव्हरीच्या वेळेत पोहोचते का?
- एखादा ग्राहक लॉयल्टी प्रोग्राम आहे का?
मार्केटिंगवर लक्ष केंद्रित करा
दोन व्यवसाय अगदी समान उत्पादने विकू शकतात, पण जो व्यवसाय त्यांच्या उत्पादनांचे मार्केटिंग करतो तो यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही तुमच्या व्यवसायाचे ऑनलाइन अस्तित्व निर्माण केल्यानंतर, ड्रॉपशिपिंग व्यवसाय तुम्हाला मार्केटिंगवर लक्ष केंद्रित करू देतो.
तुमचे ग्राहक शोधणे कठीण असू शकते, म्हणूनच शक्य तितक्या वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केटिंगचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. Shopify तुम्हाला मदत करण्यासाठी अनेक संसाधने प्रदान करते आणि Shopify App Store मधील अनेक अॅप्स तुम्हाला तुमचे ग्राहक शोधण्यात मदत करण्यासाठी तयार केले आहेत:
उणिवा टाळा
ड्रॉपशिपिंगच्या काही उणिवा असल्या तरी, त्या बहुतांश वेळा टाळल्या जाऊ शकतात. या उणिवा टाळण्यासाठी खालील धोरणांचे पुनरावलोकन करा.
उत्पादने हुशारीने निवडा
तुमच्या उत्पादन श्रेणीसाठी उत्पादने निवडणे कठीण असू शकते, ज्यामुळे काही व्यवसाय शक्य तितकी भिन्न उत्पादने विकतात. ही धोरण कामी येऊ शकते, पण बऱ्याच प्रकरणांमध्ये यामुळे व्यवसायाला मदतीपेक्षा नुकसानच अधिक होते.
प्रत्येक संभाव्य उत्पादनाची विक्री करण्याभोवती व्यवसायाचा ब्रँड तयार करणे कठीण आहे. इंटरनेटवर आधीच प्रस्थापित बाजारपेठा आहेत जिथे तुम्हाला विविध प्रकारची उत्पादने मिळू शकतात, त्यामुळे तुम्ही प्रत्येक ग्राहकाच्या अपेक्षा पूर्ण करू शकाल याची शक्यता कमी असते.
याव्यतिरिक्त, इंटरनेट सर्च इंजिनसाठी तुमचा व्यवसाय त्यांच्या वापरकर्त्यांना कधी दाखवायचा हे जाणून घेणे कठीण होते. तुमच्याकडे 100 भिन्न उत्पादने असल्यास आणि त्यांना जोडणारी कोणतीही थीम किंवा कीवर्ड नसल्यास, तुमचा व्यवसाय ग्राहकांना केव्हा दाखवायचा हे सर्च इंजिनला समजत नाही.
तुमच्याकडे सर्चशी जुळणारी एक किंवा दोन उत्पादने असली तरीही, दुसर्या व्यवसायाचा संपूर्ण व्यवसाय त्याच कीवर्डवर केंद्रित असण्याची शक्यता असते आणि त्यांचा व्यवसाय तुमच्या व्यवसायाच्या आधी दाखवला जातो. जर तुम्ही फक्त तीन किंवा चार कीवर्डवर लक्ष केंद्रित केले, तर तुमच्या स्टोअरमध्ये नेमके काय विकले जाते हे सर्च इंजिनला समजते आणि जेव्हा कोणी ते कीवर्ड शोधेल तेव्हा तुमचा व्यवसाय दाखवण्याची शक्यता जास्त असते.
उदाहरणार्थ, ज्या विद्यार्थ्यांना त्यांची डॉर्म रूम सजवायची आहे त्यांच्यासाठी तुमच्याकडे उत्पादनांची विस्तृत श्रेणी असू शकते. त्यांना स्वयंपाकघरातील भांडी, साधे फर्निचर, भिंतीवरील सजावट आणि शाळेचे साहित्य यांचीही आवश्यकता असते. अशा प्रकारची उत्पादने शोधताना सर्वाधिक कोणते कीवर्ड शोधले जातात हे पाहण्यासाठी तुम्ही Google Trends सारखे लोकप्रिय कीवर्ड टूल वापरू शकता.
पुरवठादार हुशारीने निवडा
पुरवठादार तुमच्या व्यवसायाचा मोठा भाग हाताळतात. याचा अर्थ असा की पुरवठादाराच्या गुणवत्तेचा परिणाम तुमच्या स्वतःच्या व्यवसायाच्या गुणवत्तेवर होतो. एखाद्या ग्राहकाला वाईट अनुभव आल्यास तो तुमच्या व्यवसायाकडून पुन्हा ऑर्डर देण्याची शक्यता कमी असते, मग त्या वाईट अनुभवाचे कारण तुमच्याऐवजी तुमचा पुरवठादार का असेना.
तुम्ही संभाव्य पुरवठादारांची पुनरावलोकने वाचली पाहिजेत, त्यांची धोरणे वाचली पाहिजेत आणि त्यांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यासाठी त्यांच्याशी बोलले पाहिजे. प्रतिष्ठित पुरवठादारांसोबत काम केल्याने तुम्ही चांगल्या गुणवत्तेची उत्पादने प्रदान करता, तुमच्या ऑर्डर्समध्ये कोणतेही अतिरिक्त ब्रँडिंग जोडले जात नाही आणि तुमच्या ऑर्डर्सवर वेगाने प्रक्रिया केली जाते, याची खात्री होते.
उत्पादने तुमच्या स्वतःच्या ठिकाणी ऑर्डर करा
ड्रॉपशिपिंगचा एक फायदा हा आहे की तुमचा पुरवठादार इन्व्हेंटरी व्यवस्थापित करतो, तरीही तुम्ही तुमच्या स्वतःच्या ठिकाणावर काही उत्पादने ऑर्डर करण्याचा विचार का करावा याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत:
स्वतः उत्पादनांच्या गुणवत्तेचे परीक्षण करा: उत्पादन पुनरावलोकने तुम्हाला उत्पादनाच्या गुणवत्तेचा एक चांगला सूचक देतात, परंतु तुम्ही स्वतः पाहिल्याशिवाय खात्री बाळगू शकत नाही. तसेच, तुम्ही उत्पादनाचे पॅकेजिंग पाहू शकता आणि पुरवठादार त्यांची स्वतःची जाहिरात सामग्री जोडतो का हे तपासू शकता.
मोठ्या ऑर्डर्स स्वतः शिपिंग करणे: ज्या प्रकरणांमध्ये ग्राहक अनेक भिन्न पुरवठादारांकडून उत्पादने ऑर्डर करतो, तेथे तुम्हाला प्रत्येक पुरवठादाराला शिपिंग शुल्क भरावे लागते. तुमच्याकडे आधीपासून ती उत्पादने असल्यास, तुम्ही ती एका बॉक्समध्ये ठेवू शकता आणि उत्पादने तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फक्त एक शिपिंग खर्च देऊ शकता. तुम्ही ही पद्धत वापरण्याची योजना करत असल्यास, तुम्ही उत्पादने स्वतःकडे ऑर्डर करताना ते तुम्हाला मोफत शिपिंग देऊ शकतात की नाही हे पाहण्यासाठी तुमच्या पुरवठादाराशी संपर्क साधणे ही एक चांगली रणनीती आहे.
तुमच्या ग्राहकाच्या ऑर्डर प्रक्रियेचा अनुभव घ्या: तुमचे ग्राहक जेव्हा तुमच्या स्टोअरमधून ऑर्डर करतात तेव्हा त्यांना काय अनुभव येतो हे तुम्ही पाहिले पाहिजे. तुमचे पुरवठादार किती लवकर ऑर्डर्सवर प्रक्रिया करतात हे समजून घेतल्याने तुम्हाला ग्राहकांना पाठवल्या जाणाऱ्या तुमच्या ऑर्डर सूचना ईमेल्समध्ये योग्य अपेक्षा सेट करण्यात मदत होऊ शकते.
उदाहरणार्थ, तुमच्या पुरवठादाराला ऑर्डरची प्रक्रिया करण्यासाठी 4-6 दिवस लागतात असे तुम्हाला आढळल्यास, तुम्ही ग्राहकांना तुमच्या ऑर्डर कन्फर्मेशन ईमेल्समध्ये 4-6 दिवसांत शिपिंग कन्फर्मेशन ईमेल मिळेल असे सांगू शकता. तुम्ही तुमच्या ग्राहकांना नेहमी त्यांच्या ऑर्डरविषयी पुरेशी माहिती द्यावी, ज्यामुळे त्यांना तुमच्या व्यवसायाकडून ऑर्डर करताना विश्वास वाटेल.